नवी दिल्ली :
नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात होताच, ठरल्याप्रमाणे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सहा बँकांचे विलिनीकरण काल झाले. एकूण चार बँकांमध्ये या सहा बँकांचे विलिनीकरण होत आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना जागतिक बाजारात अधिक स्पर्धात्मक करण्यासाठी हा निर्णय सरकारने घेतला होता.केंद्र सरकारच्या विलिनीकरण धोरणानुसार ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया यांचे पंजाब नॅशनल बँकेत, सिंडिकेट बँकेचे कॅनरा बँकेत, आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचे युनियन बँक ऑफ इंडियात तर अलाहाबाद बँकेचे इंडियन बँकेत विलिनीकरण करण्यात आले आहे. याची अंमलबजावणी आजपासून होणार आहे.
देशात कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे सध्या लॉकडाऊन लागू आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील काम सुरू आहे. बँकांमध्येही कमीत कमी मनुष्यबळासह काम सुरू आहे. या स्थितीत हे विलिनीकरण एकदम सुरळीतपणे होईल, असे आतातरी म्हणता येणार नाही, असे जाणकारांनी म्हटले आहे. तरीही या सर्व बँकांच्या प्रमुखांनी विलिनीकरण एकदम सुरळीतपणे पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
या विलिनीकरणानंतर देशात सार्वजनिक क्षेत्रातील सात मोठ्या तर पाच लहान बँका अस्तित्त्वात राहणार आहेत. ज्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक या मोठ्या बँकांचा समावेश आहे.