नवी दिल्ली :
बॉलिवुड किंगखान शाहरुख खान व त्याची सुप्रसिद्ध अंतर्गत सजावटकार पत्नी गौरी खान यांनी त्यांच्या दिल्लीतील घरामध्ये सर्वसामान्यांना राहण्याची संधी देऊ केली आहे. एअरबीएनबीसोबत ते यजमान बनले आहेत. यानुसार आपल्या 30 वर्षांच्या सुपरस्टारपदाच्या कालावधीतील शाहरुखच्या सुप्रसिद्ध शैलीला अभिवादन करत एअरबीएनबीची ‘होम विथ ओपन आर्म्स’ ही मोहीम भारतीयांना खान कुटुंबाच्या वडिलोपार्जित घरात राहण्याची संधी देणार आहे.
दक्षिण दिल्लीतील झाडे व हिरवळीने समृद्ध अशा पंचशील पार्कमध्ये खान कुटुंबाचे हे घर असून गौरीच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत त्याची सजावट करण्यात आली आहे. हे सुप्रसिद्ध कुटुंब आता मुंबईत राहात असले तरी त्यांच्या आयुष्यात आणि आठवणींमध्ये दिल्लीच्या या घराला विशेष स्थान असून आपल्या तिन्ही मुलांचे संगोपन त्यांनी या घरात केले आहे आणि आजही दिल्लीत आले की ते याच घरात राहतात. व्यक्तिगत वस्तू आणि जगभरातील प्रवासात जमा झालेली स्मृतिचिन्हे यांनी हे घर भरले असून शाहरुख आणि गौरी यांचा सुरुवातीच्या काळातील जोडपं म्हणून आणि नंतर एक संपूर्ण कुटुंब म्हणून झालेल्या प्रवासाचे प्रतिबिंब या घराच्या रुपाने पाहायला मिळते.
’होम विथ ओपन आर्म्स’ मोहिमेमुळे पाहुण्यांना बॉलिवुडच्या या सुप्रसिद्ध जोडप्याचा नॉस्टॅल्जिया पुन्हा जगण्याची दुर्मीळ संधी मिळणार आहे. 18 नोव्हेंबर पासून या कॅम्पेनला सुरुवात होणार असून भारतीय नागरिक या संधीचा विजेता होण्यासाठी अर्ज करू शकतात. विजेत्या भाग्यवान जोडप्याला 13 फेब्रुवारी 2021 रोजी या घरी एक रात्र राहण्याची संधी मिळणार आहे. विजेत्या जोडप्याला गौरीने स्वत: तयार केलेला कार्यक्रम, खान कुटुंबियांच्या पसंतीचे जेवण, शाहरुख खानच्या पसंतीचे, तसेच त्याचे स्वत:चे यशस्वी सिनेमे पाहाण्याची संधी आणि कुटुंबाकडून स्मृतीचिन्ह म्हणून घरी घेऊन जाण्यासाठी पर्सनलाइज्ड वस्तूंची भेट मिळणार आहे.
शाहरुखच्या घरी राहण्यासाठी इच्छुक पाहुण्यांना 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत ओपन आर्म्स वेलकम म्हणजे त्यांच्यासाठी नेमके काय, हे सांगणे गरजेचे आहे. एअरबीएनबी आणि गौरी खान यांचा समावेश असलेली निवड समिती विजेत्याची निवड करेल आणि 15 डिसेंबर 2020 रोजी विजेत्याच्या नावाची घोषणा केली जाईल.
…