नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज भारतातील जनतेशी संवाद साधला. यावेळेस त्यांनी लॉकडाउनच्या काळामध्ये भारतीय दाखवत असलेल्या संयमाचे कौतुक केलं. तसेच एकत्र येऊन करोनाला हरवूयात असं आवाहन मोदींनी देशातील जनतेला केलं. यावेळेस त्यांनी देशातील सर्व १३० कोटी भारतीयांनी ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन एक दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचे आवाहन केलं. या माध्यमातून आपण करोनामुळे पसरलेला अंध:कार दूर करु, असं मोदींनी म्हटलं आहे.
“करोनाचा सर्वाधिक फटका आपल्या गरीब जनतेला बसला आहे. त्यांना या अंधःकारामधून बाहेर कढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे. त्यासाठीच तुम्हा सर्वांकडून मला या रविवारी म्हणजेच ५ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता तुमची नऊ मिनिटं हवी आहेत,” असं मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता घरातील सर्व दिवे, लाइट्स बंद करुन घरातील बाल्कनीमध्ये, दारामध्ये एक दिवा लावा किंवा मेणबत्ती, बॅटरी किंवा मोबाईलची फ्लॅश लाइट लावून उभे राहा, असं आवाहन मोदींनी केलं. “करोनामुळे पसरलेल्या अंधःकारामध्ये आपल्याला सतत सकारात्मकतेकडे आणि प्रकाशाकडे प्रवास करायचा आहे. सर्वाधिक फटका बसलेल्या गरीब जनतेला सकारात्कमतेकडे घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपल्यालाच त्यांना सोबत घेऊन जायचं आहे, ” असं भावनिक आवाहन मोदींनी देशातील जनतेला केलं. आपण सर्वांनी एकत्र येऊन या करोनाच्या अंध:काराला पळवून लावूयात असं सांगत मोदींनी आपलं भाषण संपवलं.