Amazon ‘बंद करणार आपली ‘प्राइम नाऊ’ सेवा
नवी दिल्ली :
दिग्गज ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉननं भारतातील आपली ‘प्राईम नाऊ’ ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्रॉसरी डिलिव्हरीसाठी अॅमेझॉननं ही सेवा सुरू केली होती. यावर ग्रॉसरी व्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक, घरातलं आणि अन्य सामानदेखील ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. तसंच केवळ दोन तासांमध्ये ग्राहकांपर्यंत सर्व वस्तू पोहोचवण्याचा दावा कंपनीकडून करण्यात येतो. प्राईम नाउ हे केवळ प्राईम सेवा घेतलेल्या ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे.
दरम्यान, या सेवेला मिळणारा प्रतिसाद आणि खराब कामगिरी पाहता कंपनीनं ही सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१६ मध्ये Amazon Now या नावानं ही सेवा सुरू करण्यात आली होती. त्यानंतर कंपनीनं याचं नाव बदलून Prime Now असं केलं होतं. सध्या कंपनीकडून ही सेवा बंद करण्याची औपचारिक घोषणा करण्यात आली नाही. परंतु अॅमेझॉन प्राईम नाउ सपोर्ट बंद होणार आहे, असा मेसेज अनेकांच्या स्क्रीनवर दिसत आहे.