नवी दिल्ली :
आशियाई विकास बँकेनं (Asian Development Bank) करोना व्हायरस विरोधात सुरू असलेल्या लढाईत आर्थिक संसाधनांना मदत करण्यासाठी भारताला १.५ अब्ज डॉलर्सचं कर्ज मंजूर केलं आहे. “या संकटकाळात संघटना भारत सरकारच्या सर्व कामांना समर्थन देण्यासाठी कटिबद्ध आहे. हे कर्ज या संकटात त्वरित आवश्यक असलेल्या मदतीसाठी आहे,”असं मत आशियाई विकास बँकेचे (Asian Development Bank) अध्यक्ष मासात्सुगु असाकावा यांनी व्यक्त केलं.
करोनावर नियंत्रण मिळवणं, त्यापासून बचाव करणं आणि गरीब, तसंच आर्थिकरित्या मागासलेल्या लोकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी हे कर्ज मंजूर करण्यात आलं आहे. “त्वरित वितरित करण्यात येणारा निघी म्हणजे आशियाई विकास बँकेकडून दिल्या जाणाऱ्या मोठ्या पॅकेजचा एक भाग आहे,” असं असाकावा यांनी म्हटलं आहे.“करोनाविरोधात भारत करत असलेल्या प्रयत्नांत भारताची मदत करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. देशातील गरीब आणि वंचितांपर्यंत प्रामुख्यानं ही मदत पोहोचली पाहिजे,” असंही त्यांनी नमूद केलं.
‘…तर लाखो भारतीय गरिबीच्या फेऱ्यात’
आशियाई विकास बँकेनं (Asian Development Bank) गरजू देशांच्या मदतीसाठी ‘कोविड १९ अॅक्टिव्ह रिस्पॉन्स अँड एक्स्पेंडेचर प्रोग्राम’ (केअर्स) हाती घेतला आहे. त्याचाच भाग म्हणून या देशांना बँकेकडून कर्ज देण्यात येत आहे. याद्वारे संबंधित देशातील आरोग्य सेवांमध्ये सुधारणा, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, शेतकरी, आरोग्य कर्मचारी, महिला, ज्येष्ठ नागरिक, बांधकाम कामगारांसह आठ कोटींहून अधिक लोकांना सामाजिक सुरक्षा देण्यात येणार आहे.
अर्थ-उद्योग जगतातील ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज.