बंगळुरू :
सोशल मीडियाचा वापर आपल्या दैनंदिन आयुष्यात अधिकाधिक विस्तारत असतानाच, आता या माध्यमाचा आर्थिकदृष्ट्यादेखील फायदा करून घेण्यासाठी विविध कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. सोशल मीडियावर अधिकाधिक फॉलोअर्स असलेल्या व्यक्तींच्या माध्यमातून आपल्या ब्रॅण्डची जाहिरात करण्याचे दिवस सुरु असतानाच आता या अखंड मीडियालाच एक दर्शनी बाजारपेठ करून त्यांच्याच माध्यमातून आपले वस्तू विकण्यासाठी ‘फ्लिपकार्ट’ने आज आपल्या 2GUD या नव्या आणि स्वतंत्र सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्मची घोषणा केली. 2GUDच्या सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांना त्यांच्या पसंतीच्या प्रभावशाली व्यक्तींकरवी ताजे फॅशन ट्रेंड्स, गॅजेट्सचे रिव्ह्यू, ब्यूटी टिप्स मिळणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.
विविध विषय आणि श्रेणींमधील खास निवडलेल्या प्रभावशाली व्यक्तींच्या नेटवर्कनी बनवलेले व्हिडिओज 2GUDच्या सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्मवरील ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. या प्रभावशाली व्यक्ती व्हर्च्युअल स्टोअरमधील संग्रहाचा भाग म्हणून त्यांच्या पसंतीची उत्पादने निवडतील, जेणेकरून ग्राहकांना विविध श्रेणींमधील त्यांच्या फॅशन प्रवासाचा अनुभव घेता येईल. ग्राहकांना व्हिडिओत समाविष्ट असलेल्या उत्पादनांची खरेदी अन्यत्र कुठेही न जाता, जागच्या जागीच करता येणार आहे. कंटेंट टू कॉमर्स हा नवा ट्रेंड यानिमित्ताने साकारणार आहे.
कर्मचाऱ्यांचे ‘फ्युचर’ केले सुखकारक
याबद्दल फ्लिपकार्टच्या 2GUD चे प्रमुख चाणक्य गुप्ता यांनी सांगितले, ‘ऑनलाइनच्या प्रवाहातील पुढील २० कोटी ग्राहकांना अत्यंत सुलभतेने सोशल कॉमर्सचा अनुभव घेता यावा आणि 2GUD बाबत त्यांच्या मनात विश्वास निर्माण व्हावा, हे आमचे उद्दिष्ट आहे. अनेकदा या ग्राहकांना विश्वास आणि शैलीचा अभाव जाणवतो. अशा परिस्थितीत तुमच्यासारखीच कोणी व्यक्ती अथवा एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची शिफारस महत्त्वाची ठरत असते. प्रभावशाली व्यक्ती ऑनलाइन रिटेलचे स्वरूप बदलत असून भारतात सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म्ससाठी अधिक मोठ्या संधी खुल्या करत आहेत. देशभरात त्यांचे लक्षावधी चाहते आणि पाठिराखे असल्यामुळे ग्राहकांच्या खरेदीबाबतच्या निर्णयावर प्रभाव टाकण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. हे लक्षात घेऊन आमच्या लक्ष्यित ग्राहकांना समजून घेऊन त्यांना खरेदीबाबतचा निर्णय घेण्यास मदत करण्यास सक्षम असलेल्या काही खास प्रभावशाली व्यक्तींची आम्ही निवड केली आहे.
आजमितीस ऑनलाइन रिटेल बाजारपेठेत १५ ते २० टक्के हिस्सा असलेल्या सोशल कॉमर्सची उलाढाल येणाऱ्या दशकभरात ७० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आहे. स्वस्तातील डाटा आणि भारतातील, विशेषत: द्वितीय व तृतीय पातळीवरील शहरांमधील पहिल्यांदाच इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची वाढती संख्या पाहाता सोशल कॉमर्स उद्योगासाठीची संधी मोठ्या प्रमाणावर विस्तारत आहे.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक करा…