आणि आता आले ‘फ्लिपकार्ट होलसेल’

बंगळुरू :
रिलायन्स जिओ आणि फेसबुक पाठोपाठ आता फ्लिपकार्टने देखील किराणा रिटेल उद्योगात पसरायचे ठरवले असून, त्यांनी यासाठी ‘फ्लिपकार्ट होलसेल’ या ब्रॅण्डची आज घोषणा केली. अत्याधुनिक आणि स्थानिक पातळीवर विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन भारतातील किराणा रिटेलमध्ये बदल घडवत नवी डिजिटल बाजारपेठ फ्लिपकार्टला घडवायची आहे. त्याचवेळी वॉल-मार्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये १०० टक्के हिस्सा अधिग्रहीत करण्याचीही घोषणा केली.
फ्लिपकार्ट होलसेलला ऑगस्ट २०२० पासून सुरुवात होत असून दैनंदिन गरजेच्या वस्तू (ग्रोसरी) आणि फॅशन या श्रेणींपासून प्रायोगिक तत्त्वावरील सेवा सुरू करण्यात येणार आहे. फ्लिपकार्टमधील ज्येष्ठ अधिकारी आदर्श मेनन हे फ्लिपकार्ट होलसेलचे नेतृत्व करणार असून वॉलमार्ट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर अगरवाल हे सुलभ परिवर्तनासाठी काही काळ कंपनीसमवेत काम करणार असून काही काळानंतर वॉलमार्टमध्ये त्यांना अन्य जबाबदारी देण्यात येणार आहे.
भारतातील रिटेल परिसंस्थेसाठी किराणा आणि एमएसएमई या मध्यवर्ती आहेत. लहान व्यवसायांना त्यांचा व्यवसाय अधिक सुलभ पद्धतीने करता यावा, यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने लक्षणीय दरात निवडीचे व्यापक पर्याय उपलब्ध करून देऊन त्यांच्या गरजा भागवण्यावर फ्लिपकार्ट होलसेल लक्ष केंद्रित करणार आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू असतील, सर्वसाधारण उत्पादने असतील अथवा फॅशनशी संबंधित उत्पादने असतील, या व्यावसायिकांना आकर्षक योजना आणि प्रोत्साहनांसह निवडीसाठी व्यापक उत्पादने उपलब्ध करून देतानाच निवडीत मदत करण्यासाठी डाटाच्या आधारे शिफारशीही केल्या जाणार आहेत. तसेच, कार्यक्षमता वाढवून नफ्याच्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठी अत्यंत जलद आणि विश्वासार्ह यंत्रणेद्वारे डिलिव्हरी केली जाणार आहे.

‘फ्लिपकार्ट’ने केली ‘अरविंद फॅशन्स’मध्ये गुंतवणूक
 
किराणा आणि एमएसएमईंना वैविध्यपूर्ण उत्पादने व वस्तू उपलब्ध व्हाव्यात, यासाठी भारतातील आघाडीचे ब्रँड्स, स्थानिक उत्पादक आणि विक्रेत्यांनी फ्लिपकार्ट होलसेलशी भागिदारी केली आहे. त्याचबरोबर या भागिदारांनाही देशभरात पोहोचण्याचा मार्ग उपलब्ध होतानाच उत्पादन साठ्याचे आणि नवे उत्पादन विकसित करण्यासाठी योग्य नियोजन करण्यासाठी आवश्यक असे बाजारपेठेचे सूक्ष्म आकलन आणि किफायतशीर वितरणाचा लाभ होईल.
फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्थी म्हणाले, “भारतात ई कॉमर्सचा पाया रचणाऱ्या फ्लिपकार्ट समूहाने लक्षावधी भारतीय ग्राहकांचा खरेदी करण्याचा अनुभव आमूलाग्र बदलून टाकला आहे. फ्लिपकार्ट होलसेलच्या माध्यमातून आता आम्ही तंत्रज्ञान, लॉजिस्टिक्स आणि अर्थपुरवठा यासंदर्भातील आमच्या क्षमतांचा लाभ देशभरातील छोट्या उद्योगांना उपलब्ध करून देणार आहोत. वॉलमार्ट इंडियाच्या अधिग्रहणामुळे होलसेल व्यवसायाची सखोल जाण असलेल्या गुणवान चमूची भर पडली असून त्यामुळे किराणा आणि एमएसएमईंच्या गरजांची पूर्तता वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने करण्याच्या आमच्या क्षमतेत वृद्धी होणार आहे. या ताज्या घडामोडींमुळे फ्लिपकार्ट समूह अंतिम ग्राहक आणि व्यवसायांसाठी मूल्यवर्धन आणि निवडपर्याय वाढवण्यासाठी अधिक सक्षम होईल.”
वॉलमार्ट इंटरनॅशनलचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ज्युडिथ मॅकेना म्हणाले, “गेल्या दशकभराहून अधिक काळ भारतातील किराणा आणि एमएसएमईंना सेवा पुरवून, अल्पभूधारक शेतकऱ्यांना पाठबळ देऊन आणि देशभरात ग्लोबल सोर्सिंग आणि तंत्रज्ञान हब्ज विकसित करून भारताच्या समृद्धीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. फ्लिपकार्ट होलसेलच्या शुभारंभाच्या निमित्ताने कॅश अँड कॅरीचा पाया रचणाऱ्या वॉलमार्ट इंडियाचा कॅश अँड कॅरीचा वारसा आणि फ्लिपकार्टची कल्पक संशोधनाची संस्कृती यांचा हा अपूर्व संगम असल्यामुळे हे एक मोठे पाऊल आहे. एकमेकांच्या क्षमता आणि कौशल्याचा वापर करून हा एकत्रित चमू भारतीय व्यवसायांना वृद्धीसाठी व यशासाठी मदत करण्याच्या एकत्रित ध्येयाच्या दिशेने अधिक दमदार वाटचाल करेल. फ्लिपकार्ट होलसेलचे भवितव्य उज्ज्वल असेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here