‘गोव्याला पाहिजे १०० कोटीचे पॅकेज’

students, kamat

पणजी :
लाॅकडाउनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या समाजातील विविध घटकांना तसेच एकंदरीत अर्थव्यवस्थेला पुर्नचालना देण्यासाठी सरकारने ताबडतोब पॅकेज जाहिर करुन १०० कोटी चलनात आणावेत, अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्री  प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. विविध सामाजिक घटक, व्यावसायिक तसेच अर्थकारणांतील तज्ञ यांच्याशी चर्चा करुन दिगंबर कामत यांनी तयार केलेला ‘रोडमेप फाॅर इकोनोमिक रिव्हायवल ॲाफ स्टेट’ त्यांनी मुख्यमंत्र्याना सुपूर्द केल्यानंतर ते बोलत होते.
कोरोना संकटकाळात सगळ्याना उद्योग-व्यवसाय बंद करुन सुमारे दोन महिने घरी बसावे लागले होते. त्यामुळे गोमंतकीय आज आर्थिक विवंचनेत आहेत. सरकारने १०० कोटी चलनात आणल्यास, अर्थव्यवस्थेला पुर्नचालना मिळण्यास मदत होणार आहे. गोवा सरकार व केंद्र सरकारने अजूनही गोव्याची बिघडलेली अर्थव्यवस्था चालीस लावण्यास कोणतीच पाऊले उचललेली नाहित, असा आरोप करून कामत म्हणाले, केंद्राकडूनही सामान्य लोकांना दिलासा देणारी कसलीच घोषणा झालेली नाही. गोवा सरकारने त्वरीत अनाठायी व अनावश्यक खर्चाला कात्री लावणे गरजेचे आहे. सरकारने राष्ट्रीय क्रिडा स्पर्धा, आंतरराष्ट्रिय चित्रपट महोत्सव, पर्यटन खात्याचे रोड शो, प्रितीभोजने व सरकारी जेवणे, नविन गाड्यांची खरेदी या सर्वांवर ताबडतोब खर्च करणे बंद करावे. स्मृतीस्थळे व अन्य अनावश्यक प्रकल्पांवर जनतेचा पैसा खर्च न करता तो सामान्य माणसाकडे पोचवण्याची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी कामत यांनी केली आहे.
स्थलांतरित मजूराना दोन महिने मोफत धान्य

विरोधी पक्ष नेत्यांनी तयार केलेल्या दिशादर्शकात कृषी क्षेत्राला सर्व प्रकारची आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली आहे. गोव्यातील मोटरसायकल पायलट, रिक्शाचालक, रेंट अ बायक व्यावसायीक, छोटी हाॅटेल, चहा टपरी, तावेर्न, छोट्या गॅरेजीस व सर्विस सेंटर, सलून व ब्युटी पार्लर, दुरुस्ती केंद्रे, भाजी व फळ विक्रेते अशा घटकांसाठी दोन महिन्यांसाठी प्रत्येकी  १०हजार रुपयांचे अर्थसहाय्य द्यावे असे दिगंबर कामत यांनी म्हटले आहे. गोव्यात असे सुमारे २०हजार घटक असन, यासाठी ४० कोटींची तरतुद सरकारला करावी लागणार आहे,असे कामत यांनी सूचवले आहे. काळ्या-पिवळ्या टॅक्सी, पांढऱ्या टॅक्सी, टॅम्पो व खासगी बसेस, गाडेवाले, हुर्राक-फेणीचे उत्पादक, कदंबा बस स्थानक, नगरपालीका बाजार, रेल्वे स्टेशन वरील गाळेधारक व दुकानदार अशा सुमारे ३५०० घटकांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे  एकवेळ अर्थसहाय्य सरकारने करावे असे कामत यांनी म्हटले आहे. तसेच सरकारने त्यांचे ३ महिन्यांचे भाडे, सरकारी कर तसेच परमिट व लायसन्स फी माफ करावी अशी मागणी केली आहे. यासाठी एकुण  १० कोटीची तरतुद सरकारला करावी लागेल,असे कामत म्हणाले.
खाजेकार, चणेकार, सुवर्ण कारागीर, कुंभार, मिठकार, चितारी, गवंडी, जत्रा व फेस्तकार, रेंदेर, कलयकार व कांकणकार यांच्यासाठी माझ्या सरकारने सुरू केलेली ‘गोंयचे दायज’ हि योजना पुर्नजीवीत करावी तसेच सदर योजनेत योग्य बदल करुन, पोदेर सारख्या व्यावसायीकांना वीजेवर चालणारे फर्नेस घेण्यासाठी ५० टक्के अनुदान द्यावे. या साठी सरकारने  १० कोटींची तरतुद करावी. गोमंतकीय नाट्य व तियात्र कलाकार, गायक, वादक अशा २५०० घटकांसाठी  सरकारने   २० हजार रुपयांचे  एकवेळ अर्थसहाय्य करुन त्यांना मदत करावी. यासाठी सरकारने  ५ कोटींची तरतुद करणे गरजेचे आहे,असे कामत म्हणाले.
ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here