नवी दिल्ली :
गृहमंत्रालयाने शुक्रवारी रात्री उशिरा एक आदेश जारी केला आहे. त्यानुसार देशातील सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये नोंदणीकृत असलेली सर्व दुकाने (shops) काही अटींवर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यात निवासी भागात असलेली दुकानेही (shops) सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
महानगरपालिका आणि नगरपरिषद हद्दीतील निवासी भाग व परिसरातील दुकाने, शॉपिंग मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स उघडण्यास मात्र परवानगी देण्यात आलेली नाही. जी दुकाने नोंदणीकृत आहेत त्यांनाच ही परवानगी असणार आहे. तसेच करोना हॉटस्पॉट, कंटेनमेंट झोनमधील दुकाने मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत. या भागांत दुकाने उघडण्याची मुभा मिळणार नाही, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
…म्हणून अमेझॉन पोहचले स्थानिक दुकानापर्यंत
दुकानात ५० टक्के कर्मचारीच काम करू शकतील. त्यांनी सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोरपणे पालन करायचं आहे तसेच मास्क व हँड ग्लोव्हज वापरणे बंधनकारक असेल, असे नमूद करण्यात आले आहे. दुकाने उघडण्यास केंद्राने अटींवर परवानगी दिली असून लाखो दुकानदारांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. गेल्या २४ मार्चपासून अत्यावश्यक सेवेतील दुकानं वगळता सर्व दुकानं ही बंद आहेत. देशांत लॉकडाऊनचा कालावधी हा ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. मात्र ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी काही प्रमाणात सवलत देण्यात आली आहे.
अर्थ-उद्योग जगतातील ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज.