नवी दिल्ली :
प्रसिद्ध कार कंपनी होंडाने भारतातील ६५,६५१ कार बाजारातून परत मागवल्या आहेत. २०१८ मध्ये उत्पादन झालेल्या या कारमध्ये असलेल्या फ्युएल पम्पमध्ये तांत्रिक बिघाड असल्याच्या कारणास्तव होंडाने या कार परत मागवल्या आहेत. कारच्या फ्युएल पम्पमध्ये असलेल्या तांत्रिक दोषामुळे कारचे इंजिन बंद पडू शकते किंवा कार सुरू होण्यात अडचणी येऊ शकतात.
परत मागवण्यात आलेल्या कारमध्ये ३२,४९८ सेडान अमेझ, १६,४३४ सेडान सिटी, ७,५०० प्रिमियम हॅचबॅक जॅझ, ७,०५७ डब्ल्यूआर-व्ही, १,६२२ बीआर-व्ही, ३६० ब्रायो आणि १८० प्रिमियम एसयुव्ही सीआर-व्हीचा समावेश आहे.
अर्थव्यवस्थेची मदार गाढवांच्या पाठीवर
‘होंडाच्या भारतातील डिलरकडे कारमधील फ्युएल पम्पची दुरुस्ती किंवा बदल विनाशुल्क करून दिले जाणार आहे. २० जून २०२० पासून टप्प्याटप्प्याने ही सुविधा पुरवली जाईल आणि प्रत्येक कारमालकाशी व्यक्तिश: संपर्क साधला जाईल. सध्या डिलर मर्यादित कर्मचाऱ्यांनिशी कार्यरत असल्यामुळे सुरक्षेच्या आणि सोशल डिस्टंसिंगचे निकष पाळत ही सुविधा पुरवली जाणार आहे. कोणताही गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी डिलरला भेट देण्यापूर्वी अपॉईंटमेंट घ्यावी’, असे कंपनीने आवाहन केले आहे.