आशा कोविड-१९ लसीची…

  • डॉ. लक्ष्मण जेसानी

जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी फेब्रुवारीमध्ये ‘कोविड-१९’चा आजार हा जागतिक पातळीवरील महामारीचा रोग असल्याचे जाहीर केले आणि या विषाणूचा सामना करण्यासाठी सर्व देशांनी कंबर कसली. त्यावेळी भारतात ‘कोविड-19’ ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या फार नव्हती व इतर देशांच्या मानाने तर ती खूपच कमी होती. परदेशांतून येणाऱ्या प्रवाशांच्या तपासण्या, वैद्यकीय चाचण्या, गंभीर रुग्णांचे विलगीकरण आणि टाळेबंदी अशी त्वरीत पावले भारतात उचलण्यात आली. तथापि मे महिन्याच्या च्या पहिल्या आठवड्यापर्यंत, चाचण्या घेण्याचे प्रमाण वाढत असतानाही, ‘पॉझिटिव्ह’ रुग्णांची संख्या 50 हजारांवर गेली आहे. शहरी भागातील मोठी लोकसंख्या आणि तिची घनता यामुळे रुग्णांची संख्या आटोक्यात ठेवण्याचे काम कठीण झाले आहे. सामाजिक अंतर राखणे, लागण झालेल्यांच्या संपर्कात आलेल्यांचे त्वरीत विलगीकरण करणे आणि इतर प्रतिबंधात्मक उपायांची कठोर अंमलबजावणी करीत सरकारने टाळेबंदी आणखी वाढवली खरी, तथापि आता रोग प्रतिकारशक्ती प्रदान करणारी व दीर्घ मुदतीचा उपाय असणारी ‘कोविड-19’ वरील लस कधी येईल, याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
सध्या देशभरातील अनेक शास्त्रज्ञ आणि उत्पादक कंपन्या लवकरात लवकर लस विकसित करण्यासाठी संशोधन करीत आहेत. ही लस १५ ते १८ महिन्यांच्या कालावधीत निर्माण व्हावी, असे यातील अनेकांचे प्रयत्न आहेत. सामान्यतः कोणतीही लस तयार करण्याच्या प्रक्रियेत पहिल्या टप्प्यापासून ते वैद्यकीय चाचण्या घेण्यापर्यंतच्या कामासाठी ५ ते ७ वर्षांचा अवधि लागत असतो. त्या तुलनेत ‘कोविड-19’ वरील लस विकसीत करण्याचे काम फारच वेगात होत असल्याचे दिसून येते. कोरोना व्हायरस लस विकसनाच्या कामी गुंतलेल्या कृती दलाने दिलेल्या माहितीनुसार, भारतात सुमारे ३० ठिकाणी लस विकसीत करण्याचे काम सध्या वेगवेगळ्या टप्प्यात सुरू आहे. जगातील सर्वात मोठा लस-उत्पादक देश म्हणून जागतिक स्तरावर भारत अगोदरच लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसवरील लशीच्या विकासात भारत मोठी भूमिका बजावू शकतो.
‘या’ कंपनीने केले देशातील पहिले कोविड स्वॅब विकसित

यातील अनेक लशींच्या विकसनामध्ये चाचणीचा टप्पा सुरू झाला आहे. विविध पध्दतींचा वापर यासाठी करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने घेतलेल्या एकूण आढाव्यानुसार, क्लिनिकल चाचण्यांच्या टप्प्यात सध्या ८ लशी आहेत, तर शंभराहून अधिक लशी त्याअगोदरच्या टप्प्यात आल्या आहेत. विषाणूची वाढ शरिरात करण्याच्या पारंपारिक पध्दतीपेक्षा ‘आरएनए’ पद्धतीचा वापर करून सध्या लस विकसनाच्या कामास वेग देण्यात आला, ही खरे तर नावीन्याची बाब आहे. कोरोना विषाणूच्या पृष्ठभागावर असलेल्या ‘स्पाइक प्रोटिन’वर लक्ष केंद्रित करून त्या प्रोटिनच्या आधारे लस तयार करण्यात येत आहे. शरीरात लस टोचल्यानंतर, शरीर त्या प्रोटिनला ओळखेल आणि विषाणूला पराभूत करण्यासाठी प्रतिद्रव्य तयार करेल. भविष्यात शरीरामध्ये विषाणूची लागण झाल्यास रोग प्रतिकारशक्तीच्या यंत्रणेने असाच प्रतिसाद द्यावा, यासाठी त्यास प्रशिक्षित केले जाईल.
जागतिक स्तरावर लशींचे उत्पादन आणि वितरण कसे केले जाऊ शकते, याचाही अभ्यास अनेक संस्था व कंपन्या करीत आहेत. कोणत्याही संकटाच्या काळात वितरण आणि उत्पादन प्रणाली विकसित करणे हा त्या संकटाचा सामना करण्यातील एक महत्त्वाचा भाग असतो. या दृष्टीने, ‘सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ ने जाहीर केले आहे की लशींचा सर्वात मोठा उत्पादक या नात्याने ही कंपनी ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लशींचे ६० दशलक्ष डोस इतके मोठ्या प्रमाणात उत्पादन करील. ऑक्सफोर्डने तयार केलेली ‘ChAdOx1 nCoV-19’ ही लस मानवी चाचणीच्या अवस्थेत आहे. यावर्षी सप्टेंबरपर्यंत हा टप्पा पूर्ण होणे अपेक्षित आहे. ही लस यशस्वी ठरली आणि आपल्या सर्वांची प्रार्थना फळास आली, तर जवळजवळ प्रत्येकाला उपलब्ध व्हावी याकरीता ‘रॉयल्टी-मुक्त’ स्वरुपात ती बाजारात येईल.
इटली आणि इस्त्राईलमध्ये लवकरच यशस्वीपणे लस विकसीत होईल, अशा काही बातम्या आहेत. लवकरात लवकर लस विकसित करण्याच्या एकत्रित प्रयत्नांसह, या वर्षाच्या अखेरीस किमान एक तरी लस, अगदी आपत्कालीन वापरासाठी असली तरीही, अस्तित्वात येणे शक्य आहे. तथापि, ती विकसित होऊन तिचे उत्पादन होईपर्यंत आपल्याला या कोरोना व्हायरसचा उद्रेक आटोक्यात आणण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवीत सावधगिरी बाळगणेच आवश्यक असणार आहे.

(लेखक नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल्सच्या संक्रमक आजार विभागाचे सल्लागार आहेत.)
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here