अमेरिकेचा अहवाल आणि भारतीय मुस्लीम

muslim
dss
  • अस्लम जमादार

यूएससीआयआरएफच्या नुकताच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार देशातील अल्पसंख्याकांसंदर्भात मोठे प्रश्नचिन्ह उभे केले असून भारताची टीअर 2 अर्थातच विशेष चिंता असणारा देश असे संबोधले आहे. या अहवाल मुस्लिमांनी खरेच गांभीर्याने घेण्याची गरज आहे का?

आज संपूर्ण जग कोरोनासोबत लढत असताना भारत हा एकमेव देश असेल जेथे कोरोनापेक्षा धार्मिक विषाणूने अधिक थैमान घातले आहे. मुस्लिमांना कोरोनाच्या काळात असुरक्षिततेचीच भावना वाटू लागली आहे, त्यातच तबलिगी मर्कजच्या घटनेमुळे कोरोनाचा फैलाव केवळ मुस्लिमामुळे होत आहे ,अशा प्रकारचे जे राजकारण चर्चेत आहे त्यामुळे सामान्य मुस्लीम संभ्रमित आहे. तसेच मुस्लीम फळ-विक्रेतेकडून फळे न घेण्याचे आवाहनामुळे काय करावे अन् काय नाही या विवंचनेत तो सापडला आहे.
एक मात्र खरे, आमचा खेड्यातील हिंदू-मुस्लीम अशा वक्तव्यामुळे दुरावला जाऊ लागला आहे, त्याची मने पुन्हा पूर्ववत होण्यास किती काळ लागेल? हे मात्र सांगणे आजमितीला अशक्यच आहे. मुस्लिमांनी मात्र येणारा काळ किती गंभीरतेचा असेल आणि त्यावर मुकाबला करण्यासाठी सकारात्मक पद्धतीने पुढे हे यावेच लागेल. कोरोनाच्या काळात काही सकारात्मक घटना ह्या मुस्लिमकडून झालेल्या आहेत, त्यांना वेळोवेळी प्रसिद्धी मिळाली होतीच हे ही विसरून चालणार नाही. सर्वप्रथम मुस्लिमांनी काही बाबींचा विचार करावा…

muslim

गरीब मजुरांवर कोरोनाची कुर्‍हाड?

उदाहरणार्थ :
आपल्या शेजारील/गावामधील मुस्लिमेतर जाती-धर्मामधील अंत्ययात्रेसाठी सर्वप्रथम धावून जा. त्यांना मदतीची अपेक्षा असल्यास ती पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारा. नुकतेच अंत्ययात्रेत मुस्लीम तरुण सहभागी होऊन पुढे आल्याचे सर्व माध्यमांनी, सोशलमिडीयाने कौतुक केल्याचे आपण पहिले असेल. त्यांनाही ह्या मिळालेल्या अमाप प्रसिद्धीची कल्पना नसेल त्यांच्या ह्या कार्याची नोंद सर्व जगाने क्षणात घेतली हे आपण पाहिले पाहिजे.
तसेच कर्नाटक येथील मंगलोर शहराजवळील अब्दुलरहमन गुद्दींनाबली ह्या 55 वर्षीय शेत मजुराने हजला जाण्यासाठी जमा केलेल्या पैशातून चक्क कोरोनाकाळात खेड्यातील गरजू गोर-गरिबांना अन्नधान्य घेऊन दिले. हा खरा उदात्तपणा. इथेच त्याचा हज कबूल झाला, अन् पुण्य त्यांच्या पदरी. अर्थात हजची रक्कम कोरोनामध्ये दान करण्याच्या त्यांच्या या दातृत्वाचे सर्व माध्यमांनी तोंडभरून कौतुकच केले. याचाच अर्थ तुमच्या कार्याची दखल घेतली जातेच. मग तुम्ही मुस्लीम असलात तरी…
रमजान व इतर काळात देखील गोरगरीब त्यांचे अन्न-वस्त्र -रोजगारासाठी जकातच्या माध्यमातून कायमस्वरूपी योजनेसाठी कटिबद्ध राहण्यासाठी क्रियाशील राहावे.
मदरशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नेहमीच साशंकतेचा राहिला आहे. ह्या मुलांना धार्मिक शिक्षणाबरोबर बाहेरील जसे की तांत्रिक, व्यवसायभिमुख घडविले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या दृष्टिकोन बदलण्यास मोठा हातभार लागू शकेल. आणि मदरशातील मुले ही इतर मुलांसारखीच असतात, हा संदेश सर्वत्र पोहोचेल. बाहेरील वातावरणाचा त्यांना प्रत्यक्ष फायदा होऊ शकेल, असे प्रयत्न झाले पाहिजेत.

muslim

उदाहरणार्थ :
फावल्या वेळात (सध्या लॉकडाउनमुळे म्हणजे अभूतपूर्व संधीच चालून आली आहे) इतर धर्माचे ग्रंथ (रामायण, महाभारत, बायबल) वाचन आणि सखोल ज्ञान प्राप्त करा. त्याचा भावी आयुष्यात केव्हाही सकारात्मक उपयोग होऊ शकतो.
एका वर्षात किमान 6 ते 8 मुस्लिमेतर मित्र, निस्वार्थी भावनेने जोडा. त्यांना महिन्यातून किमान एक वेळ तरी भेटा आणि कोणताही धार्मिक विषय न निवडता मनमोकळेपणाने साहित्य, खेळ, रोजगार, शिक्षण आदी विषयांवर चर्चा करा. एकमेकांच्या अडीअडचणीला, दु:खाच्या प्रसंगी धावून जा.
प्रत्येक गावागावांत सर्व क्षेत्रातील अनुभवी, पारंगत जसे की शिक्षक, प्राचार्य, सामाजिक कार्यकर्ते, कॉर्पोरेट क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी, उच्चशिक्षित युवा वर्ग यांनी किमान महिन्यातून एकदा एकत्र येऊन वैचारिक बैठक घ्या. एकत्र येणे शक्य नसल्यास झूम मिटिंग हा पर्याय उपलब्ध आहे, त्याचा जरूर उपयोग करावा. आणि मशिदीतील धर्मगुरू आणि कार्यकारिणीशी विचरविनिमय करून चर्चा घडून आणावी. बाहेरील जीवनातील एखादा सामाजिक उपक्रम किंवा समस्या ह्या धर्मगुरूंना माहीत असतीलच असे नाही अशा वेळेस समस्या आणि त्यावरील तोडगा ह्याबाबत सकारात्मक चर्चा घडवून आणण्याची जबाबदारी उचलावी.

दृष्टिकोन बदला आणि नवीन प्रणाली आत्मसात करा :
कॉर्पोरेट सेक्टरमध्ये एखादा गंभीर प्रश्न उद्भवला किंवा एकच समस्या वारंवार घडत असेल तर 8 डी हे टेक्निक अवलंबले जाते. यामध्ये वारंवार व्हाय? हा प्रश्न विचारत समस्येच्या मुळापर्यंत जात संभाव्य उत्तर शोधले जाते.

musilm

उदा. कोरोनाच्या निमित्ताने हिंदू फ्रूट स्टॉल वसवले जात असून, मुस्लीम फ्रूट विक्रेत्यांकडून फळ न घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यावर मुस्लिमांनी लागलीच ही बाब गंभीर घेत जणू आता जीवन-मरण्याचा प्रश्न उद्भवणार की काय म्हणून पोलीस तक्रार देखील नोंदविली आहे. खरे तर मुस्लिमांनी लगेच प्रतिक्रिया देण्याची गरज बिलकूल नाही. मी लहानपणापासून पाहत आलो आहे, बहुतांशी चिकन-मटण ह्यांची दुकाने हलाल म्हणून मुस्लीम बांधवच चालवतात तसेच हिंदूंच्या पूजेची साहित्य फळे-फुले मंडईजवळीळ बहुतांशी मुस्लीमच असतात अन् हिंदू मोठ्या भक्तिभावाने खरेदी करतात त्यावेळेस कुठलाही धर्म आड येत नाही कारण एकमेकावर असलेला परम-विश्वास. हा विश्वासच तुमचे जीवन फुलवितो म्हणूनच हा विश्वास अधिक वृद्धिंगत करण्याची अन् तो कायम टिकवण्याची आज खर्‍या अर्थाने समाजाला गरज आहे.
कोरोनाचा सध्याचा आणि कोरनानंतरचा काळ मुस्लिमांसाठी निश्चितच आव्हानात्मक असणार आहे. नुकताच अमेरिकेने प्रसिद्ध केलेला जगाचा धार्मिक अहवाल असो वा इतर आखाती देशांतून भारतीय मुस्लिमासाठी संदेश. भारतीय मुस्लिमांनी बिलकूल गांभीर्याने घेण्याचे कारण नसून उलटअर्थी या भारतीय भूमीमध्येच आपला सतर्कपणा, सकारात्मकता, आपली बुद्धिमत्ता इतर समाजाशी जुळवून घेण्याची आपली कार्यशैली घेऊन भारतीय मुस्लीम अधिक सुरक्षित असल्याची बाब जगाला दाखवून देण्याची वेळ आली आहे. अर्थात इतर समाजानेदेखील समजून घेऊन जुळवून घेण्याची मानसिकता ठेवायला हवी, कारण साने गुरुजींनी म्हटलेले आहेच,
‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे…’

ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here