महाराष्ट्राकडे आली ‘इतकी’ गुंतवणूक

​मुंबई: 
कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन सुरु असतानाच महाराष्ट्रात सुरु झालेल्या  मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 मध्ये आजच्या पहिल्या दिवशीच तब्बल १६ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. त्यामुळे या अत्यंत आशादायी पावलांसाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुंतवणूकदारांचे आभार मानले आहेत.  गुंतवणूकदारांनी दाखवलेल्या  या विश्वासामुळे अर्थचक्राला गती मिळणार आहे.  त्याचप्रमाणे राज्यात येणाऱ्या लहान मोठ्या उद्योगांना  उद्योग स्थापन करण्यात कोणतेही अडथळे येणार नाहीत, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
​उद्योग विभागाच्यावतीने मॅग्नेटीक महाराष्ट्र 2.0 चा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत आज शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध देशांचे वाणिज्यदूत, गुंतवणूकदार. उद्योगपती ऑनलाइन उपस्थित होते. विविध 12 देशांतील गुंतवणुकदारांसोबत 16 हजार 30 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले.
युनियन बँक करतेय विभागीय विस्तार

​अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, सिंगापूर आदी देशांतील तसेच काही भारतीय गुंतवणुकदारांसोबत हे करार करण्यात आले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, उद्योग राज्यमंत्री अदिती तटकरे,मुख्यसचिव अजोय मेहता , उद्योग सचिव उद्योग विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, वेणूगोपाल रेड्डी व एमआयडीसी चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी. अनबलगन उपस्थित होते. व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.
​इतर देशांच्या तुलनेत आपल्या राज्यात परकीय गुंतवणूक वाढ होईल आणि रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले या उद्योगांसाठी राज्यात सुमारे चाळीस हजार हेक्टर जमीन राखीव ठेवलेली आहे. विविध परवान्याऐवजी आता 48 तासांत महापरवाना दिला जाणार आहे. याशिवाय औद्योगिक कामगार ब्यूरो सुरू केला जाणार आहे अशी माहितीही त्यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here