नवी दिल्ली :
करोनामुळे विमान वाहतूक क्षेत्राला प्रचंड मोठा फटका बसला आहे. त्यात आधीच कर्जाच्या ओझ्यामुळे ढबघाईस आलेल्या एअर इंडियाची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे. याची झळ आता कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही सोसावी लागणार आहे. एअर इंडियानं काही कर्मचाऱ्यांना विना पगारी पाच वर्षांपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाच्या मंडळानं एअर लाईन्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकानं त्यासाठी परवानगी दिली आहे.
‘टिकटॉक’सह ५९ चिनी अॅपवर बंदी
एअर इंडियाच्या मंडळानं एअरलाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक व मंडळाच्या अध्यक्षांना स्टाफमधील नॉन परफॉर्मिंग कर्मचाऱ्यांना पाच वर्षांपर्यंत विना पगारी सक्तीच्या रजेवर पाठवण्याची परवानगी दिली आहे. कोणत्या कर्मचाऱ्यांना सुटीवर पाठवायचं यासंदर्भात कंपनीकडून मूल्याकंन केलं जाणार आहे. यात कर्मचाऱ्यांची कामासाठीची उपयुक्तता, कार्यक्षमता, कामाविषयीची गुणवत्ता, कर्मचाऱ्याचे आरोग्य, भूतकाळातील सुट्यांबद्दलचं कर्मचाऱ्याचं रेकॉर्ड कसं आहे, यासह इतर बाबींवर मूल्याकंन केलं जाणार आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांची यादी तयार केली जाणार असून, त्यातून कोणत्या कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवायचं याचा निर्णय घेतला जाणार आहे. १५ ऑगस्टपर्यंत यावर निर्णय घेण्यात येणार आहे.
एअर इंडियात तब्बल १३ हजार कर्मचारी कायमस्वरूपी कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या पगाराचा महिन्याला खर्च २३० कोटी रुपये इतका आहे.
व्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक करा…