​​कोरोना संसर्ग साखळी तोडण्यासाठी ‘प्रोजेक्ट स्टे आय’

एसबीआय, एचयूएल, ड्यूश बँक, लेमन-ट्री, जिंजर, ओयो, झोमॅटो यांचा विशेष उपक्रम

Project I from Apolo Hospital for Covid-19

मुंबई :
भारतातील सर्वात मोठी एकात्मिक आरोग्य सेवा शृंखला अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपने कोविड-१९ विरोधात सुरु केलेल्या प्रोजेक्ट कवच या सर्वसमावेशक योजनेला पुढे वाढवले गेले आहे. प्रोजेक्ट कवच या योजनेची घोषणा २६ मार्च रोजी केली गेली होती. कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी संसर्गाची साखळी तोडण्याच्या #BREAKTHECHAIN धोरणामध्ये आयसोलेशन म्हणजेच विलगीकरण किंवा इतरांपासून दूर, वेगळे राहणे हा सर्वात मोठा भाग आहे.  प्रोजेक्ट स्टे आय हा कोविड-१९ विरोधातील लढाई अधिक जास्त मजबूत करण्याचा अभिनव उपक्रम आहे. यामध्ये क्वारंटाईनसाठी थोड्याफार वैद्यकीय देखभालीची सुविधा असलेल्या आयसोलेशन रूम्स हॉटेल्समध्ये बनवल्या जातील, विषाणूचा फैलाव न होता लोकांना ठीक करण्यासाठी बॅरियर निर्माण केले जातील.
नवी मुंबई, मुंबई, हैदराबाद, चेन्नई, कोलकाता, बंगलोर या शहरांमध्ये ५०० खोल्यांपासून सुरुवात करत दर तीन दिवसांमध्ये ५० खोल्या अशाप्रकारे ही संख्या वाढवत नेली जाईल, संपूर्ण देशभरात ५००० खोल्यांचे उद्धिष्ट पूर्ण केले जाईल. सरकारकडून विनंती, सूचना, स्थानिक आरोग्यसेवा पुरवठादारांकडून आणि सीएसआरकडून मिळणाऱ्या समर्थनानुसार इतर शहरांमध्ये देखील हा उपक्रम वाढवला जाईल. यासाठी किफायतशीर आणि सुरक्षित खोल्या, स्वच्छ वातावरण रातोरात तयार होणे सुनिश्चित करण्यासाठी अपोलो हॉस्पिटल्सने हिंदुस्थान युनिलिव्हर, स्टेट बँक ऑफ इंडिया, ओयो रूम्स, लेमन ट्री, जिंजर हॉटेल्स आणि झोमॅटोसोबतच्या सहयोगातून हा उपक्रम करण्यात येणार आहे.
या संधर्भात बोलताना अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. संगीता रेड्डी यांनी सांगितले, “आजार मोठ्या प्रमाणावर पसरू नये यासाठी स्क्रिनिंग, टेस्टिंग आणि अति धोका असलेल्या लोकांना राज्यातील क्वारंटाईन सुविधांमध्ये ठेवण्यासाठी भारत सरकारकडून उचलली जात असलेली पावले नक्कीच कौतुकास्पद आहेत.  परंतु एका बाजूला टेस्टिंग क्षमतांची व्याप्ती व प्रमाण वाढवले जात असतानाच दुसरीकडे पॉझिटिव्ह केसेसची संख्या वाढण्याची देखील दाट शक्यता आहे.  कोविड-१९ च्या रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे ज्यांना क्वारंटाईन गरजेचे आहे अशा लोकांची संख्या खूप वाढेल.  यामुळे क्वारंटाईनसाठी सरकारी सुविधांवरील ताण खूप जास्त वाढेल.  हीच वेळ आहे की खाजगी क्षेत्राला आपल्या सरकारची मदत करण्यासाठी आणि सरकारी क्षमता वाढवण्यासाठी पुढे आले पाहिजे.” प्रोजेक्ट स्टे आयमध्ये लोकांसाठी स्वच्छ, सुविधाजनक आयसोलेशन आणि क्वारंटाईन सुविधा निर्माण केल्या जातील ज्यांना सक्रिय वैद्यकीय देखरेखीची गरज नसते. यामुळे आरोग्यसेवांवरील ताण कमी होईलच शिवाय कुटुंबांसाठी देखील ही खूप मोठी सुविधा असेल.
स्वतःचा खर्च स्वतः उचलणारे आणि सीएसआरकडून आर्थिक मदत घेणारे अशा दोन्ही प्रकारच्या ग्राहकांचा समावेश या मॉडेलमध्ये असणार आहे. समाजातील सर्व सामाजिक आणि आर्थिक स्तरातील लोकांना या सेवांचा लाभ घेण्याच्या समान संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी यामध्ये विविध सुविधा पुरवणाऱ्या ब्रॅंड्ससोबत भागीदारी करण्यात आली आहे. एसबीआय आणि एचयूएल यांच्यातर्फे ए-कॅटेगरी खोल्यांपैकी (ओयो) ५०% खोल्या गरजू व गरिबांसाठी मोफत दिल्या जातील ज्यांना त्यासाठी खर्च करणे शक्य नसेल.
स्टे आय अंतर्गत खोली बुक करण्यासाठी WWW.ASKAPOLLO.COM वर जाऊन होम पेजवरील फॉर्म भरावा लागेल. किंवा १८६०५०००२०२ या २४X७ हेल्पलाईन क्रमांकावर देखील संपर्क साधता येईल. अपोलो हॉस्पिटल्सची टीम तीन तासांच्या आत बुकिंग कन्फर्मेशन आणि चेक-इनसाठी आवश्यक बाबी या माहितीसह त्या व्यक्तीला संपर्क करेल. फॅसिलिटीमध्ये चेक-इन केल्यानंतर अपोलो हॉस्पिटल्सकडून दर दिवशी दोन व्हर्च्युअल मेडिकल राउंड्सची सुविधा प्रदान केली जाईल, यामध्ये एक विशेषज्ञ ASKAPOLLO / २४/७ प्लॅटफॉर्म्सवर चोवीस तास उपलब्ध असेल. 

एचयूएलचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर संजीव मेहता यांनी सांगितले, “सध्याच्या कठीण काळात कोविड-१९ विरोधातील लढाईमध्ये आपल्या सरकारच्या मदतीसाठी खाजगी क्षेत्राला पावले उचलणे गरजेचे आहे. विषाणूचा फैलाव होण्यापासून रोखण्यासाठी आयसोलेशन सुविधा असणे खूप गरजेचे आहे. यामुळे सरकारने आधीच सुरु केलेल्या क्वारंटाईन व्यवस्थेला पुढे नेण्यात मदत मिळेल. या दिशेने उचलले गेलेले आमचे प्रत्येक पाऊल कोविड-१९ विरोधातील लढाईमध्ये उपयोगी ठरेल आणि एकजुटीने आपण या संकटाला नक्की हरवू शकू.” तर ओयो रूम्सचे संस्थापक व ग्रुप सीईओ रितेश अगरवाल यांनी सांगितले, “कोविड-१९ विरोधातील लढाईत आम्ही राज्य सरकार आणि खाजगी संघटनांसोबत काम करू इच्छितो. वैद्यकीय व्यावसायिकांचे मार्गदर्शन आणि देखरेखीखाली अतिशय चांगल्या पद्धतीने स्वच्छ केल्या गेलेल्या पेपर युज क्वारंटाईन सुविधा निर्माण करण्यासाठी आमच्या क्षमता उपयोगात आणल्या जाव्यात यासाठी आम्ही अपोलो हॉस्पिटल्ससोबत सहयोग केला आहे.’
ड्यूश बँक ऑफ इंडियाचे चीफ कंट्री ऑफिसर कौशिक शापारिया यांनी सांगितले, “आम्ही इतर देशांमध्ये पाहिले आहे की, गंभीर आरोग्य सेवांची गरज पडल्यास उपलब्ध सुविधांना परिवर्तित केले जाऊ शकते. आमची ही भागीदारी सध्याच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी उचलले गेलेले पाऊल आहे.  हे मॉडेल गरजू लोकांना आवश्यक सुविधा लवकरात लवकर पोहोचवण्याचा अतिशय चांगला मार्ग आहे, यामुळे आजाराचा फैलाव होणे टाळले जाऊ शकते.” झोमॅटोचे सह-संस्थापक आणि सीओओ गौरव गुप्ता यांनी सांगितले, “अत्यावश्यक सेवा पुरवठादार म्हणून आमच्यासाठी हे महत्त्वाचे आहे की जगभरात पसरलेल्या या साथीच्या विरोधात लढण्यासाठी आमच्या नैपुण्याचा वापर करण्याचे मार्ग शोधून काढले जावेत. आयसोलेशन काळात लोकांना चांगले जेवण मिळावे यासाठी सेवा प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे. पुरवठ्यासाठी आम्ही आमचे नेटवर्क अधिक सक्षम बनवत आहोत आणि दर दिवशी जेवण पुरवण्यासाठी आमच्या लॉजिस्टिक्स क्षमतांचा वापर करत आहोत.”
जिंजरच्या मॅनेजिंग डायरेक्टर आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर दीपिका राव यांनी सांगितले, “अशा कठीण काळात आपल्याला जे शक्य असेल त्या पद्धतीने मदत करण्यासाठी आम्ही सरकार आणि आरोग्यसेवा व्यावसायिकांसोबत उभे आहोत. प्रोजेक्ट स्टे-आयमध्ये निवडक ठिकाणी आमच्या हॉटेल सुविधा वैद्यकीय व्यावसायिकांचे मार्गदर्शन आणि देखरेखीनुसार क्वारंटाईन सेंटर्स म्हणून उपयोगात आणल्या जातील. आम्ही आमचे कर्तव्य निभावत आहोत, या साथीला रोखण्यासाठी प्रयत्नशील असलेले आमचे वीर फ्रंटलाईन जिंजर सहकर्मचारी, व्यावसायिक, डॉक्टर्स आणि नर्सेस यांचे आम्ही आभारी आहोत.” लेमन ट्री हॉटेल्स लिमिटेडचे प्रेसिडेंट विक्रमजीत सिंह यांनी सांगितले, “आपला देश या साथीच्या अतिशय गंभीर स्टेजमधून जात आहे आणि पंतप्रधानांनी घोषित केलेला २१ दिवसांच्या लॉकडाउनचा निर्णय हा संसर्ग रोखण्यासाठी अतिशय विचारपूर्वक घेतला गेलेला आहे.  परंतु तरीही येत्या काळात पॉझिटिव्ह केसेसची संख्या खूप जास्त असण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामुळे असिम्प्टोमॅटिक लोकांसाठी क्वारंटाईनमध्ये राहण्यासाठी सुविधांची गरज वाढेल. आम्ही असे मानतो की, खाजगी क्षेत्रासाठी खास करून हॉस्पिटॅलिटी उद्योगासाठी सरकारला या साथीविरोधात लढाईत मदत करण्यासाठी सक्रिय भूमिका निभावणे अत्यंत आवश्यक ठरेल.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here