​​’द बिझनेस टाइम्स’ ​आजपासून तुमच्या सेवेत… ​

the business times

नमस्कार,
​अर्थ व्यवहार, व्यापारउदीम, स्टार्टअप, शेअर बाजार या सगळ्या गोष्टी फक्त इंग्रजीमध्येच लिहायच्या, बोलायच्या आणि करायच्या गोष्टी नाहीत. ‘केल्याने उद्योग’​ म्हणणारी आपली परंपरा. मग असे असताना आपण उद्योग करायचा पण समजून घेताना मात्र अन्य भाषेचा आधार का घ्यायचा? जगभरातील अभ्यासकानी वेळोवेळी नमूद केले आहे कि, आपल्या मातृभाषेत घेतलेले ज्ञान हे चिरंतन टिकते. मग अशावेळी आपल्या अर्थव्यवहाराची माहिती आपल्याच भाषेत, आपल्या वेळेत आणि तेही विनामूल्य मिळाली तर..? हाच नेमका विचार घेऊन आमची टीम यावर विचार करत होती. आणि त्यातून फळाला आली, ‘द बिझनेस टाइम्स डॉट इन’.
तुमची स्वत:ची, हक्काची अर्थ विषयक वृत्त/लेख/ माहिती/ सहकार्य देणारी हि वेबसाईट. अभ्यासू पत्रकारांनी सुरु केलेली हि अर्थसाईट असल्याने हि दैनिकाप्रमाणेच काम करेल. म्हणजे यावर दिवसभरात अर्थविषयक वेगवेगळ्या महत्वाच्या बातम्या प्रसिद्ध करण्यात येतील. त्याचसोबत आठवड्याला एक मुलाखत, व्यवसाय मार्गदर्शन, गुंतवणूक मार्गदर्शन, शेअर मार्केट, स्टार्टअप बद्दल माहिती-मार्गदर्शन-मुलाखत, स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध उद्योग मंडळे, चेंबर ऑफ कॉमर्स, व्यापारी मंडळे आदींबद्दल माहिती, लेख, विविध ब्रँडचा आढावा घेणारे लेख आदीसह विविध बाबी यावर नियमित प्रकाशित करण्यात येतील. ​या​ क्षेत्रातील विविध मान्यवर व्यावसायिक, लेखक, मार्गदर्शक, सल्लागार म्हणून ​​आपल्यासोबत या उपक्रमात आहेत. ​थोडक्यात तुम्ही सर्वसामान्य वाचक असाल, नवउद्योजक, प्रस्थापित व्यावसायिक, गुंतवणूकदार किंवा विद्यार्थी ‘द बिझनेस टाइम्स’ आहे खास तुमच्यासाठीच. तुमच्या प्रत्येकाच्या गरजा लक्षात घेऊनच याला आकार देण्यात आला आहे.
या उपक्रमात तुम्हीदेखील सक्रिय सहभागी होऊ शकता. तुमच्या व्यापार, उद्योग, स्टार्टअप किंवा तुम्ही सक्रिय असलेल्या उद्योग मंडळाबद्दल माहिती/लेख/बातम्या तुम्ही आम्हाला पाठवू शकता. आम्ही त्याला सुयोग्य प्रसिद्धी देऊ. त्याचप्रमाणे ‘द बिझनेस टाइम्स’सोबत तुम्ही जाहिरातदार म्हणूनही सक्रिय राहू शकता आणि आपल्या उदयॊगाची जाहिरात अत्यल्प खर्चात सर्वदूर पोहोचवू शकता. 
सरते आणि नवे वर्ष कोरोनाचे संकट डोक्यावर घेऊनच आले आहे. या सगळ्या काळात आपण आपल्या घरीच बसून सरकारला, समाजाला आणि आपल्या कुटुंबाला सहकार्य करू शकतो. टाळेबंदी संपायला अजून १४ दिवस आहेत. त्यानंतर अजून काही दिवस आपली आणि देशाची आर्थिक घडी सुनियोजित होण्यासाठी जातील. हे सगळे लवकर व्हावे आणि आपण पुन्हा एकदा निरामय आणि संपन्न वातावरणात जगायला सुरुवात करू अशी सदिच्छा देत, आपल्या हाती ‘द बिझनेस टाइम्स डॉट इन’ सोपवत आहे. 

धन्यवाद!
स्नेहांकित 
किशोर अर्जुन
व्यवस्थापकीय संपादक
द बिझनेस टाइम्स डॉट इन

the business times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here