‘या’मुळे होऊ शकेल कच्च्या तेलाच्या किंमतींत घट

there is chance to decrease crude oil price

मुंबई :
आगामी काही आठवड्यात ओपेक उत्पादन कपात करेल, या आशेने मागील आठवड्यात डब्ल्यूटीआय क्रूडच्या किंमतींनी २५ टक्क्यांची बढत घेत विक्रमी सुधारणा केली. सध्याच्या एनर्जी मार्केटमधील स्थितीच्या पार्श्वभूमीवर ओपेक संघटनेची आपत्कालीन बैठक बोलावण्याची घोषणा सौदी अरेबियाने केली. एका अहवालानुसार, दररोज ८ ते ९ दशलक्ष बॅरल तेल निर्मितीत कपात केल्यास क्रूडच्या किंमती वाढतील, असा ओपेकचा अंदाज आहे. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे अकृषी कमोडिटीज व चलन मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्ल्या यांनी सांगितले की जागतिक स्तरावरील लॉकडाउनच्या चिंतेमुळे क्रूडच्या किंमती कायमच वाढत्या राहिल्या. लॉकडाउन आणि सोशल डिस्टान्सिंगच्या प्रोटोकॉलमुळे विमान वाहतूक आणि रस्ते वाहतूक क्षेत्रावर गंभीर परिणाम झाला असून यामुळे कच्च्या तेलाच्या मागणीवरही मोठा परिणाम झाला आहे. यामुळे या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमती १८०० रुपयांपेक्षा कमी होतील असा अंदाज आहे.
चीनच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्याच्या आशेमुळे सोन्याच्या किंमतींवर मागील आठवड्यात नकारात्मक परिणाम झाला होता. स्पॉट गोल्डच्या किंमती गेल्या आठवड्यात ०.२ टक्क्यांनी घसरल्या. दरम्यान या आठवड्यात सोन्याच्या किंमती बाजारात ४४,५०० रुपये प्रति १० ग्राम अशा रितीने वाढण्याचा अंदाज माल्ल्या यांनी व्यक्त केला.
मागील आठवड्यात एलएमईच्या धातूच्या किंमतींवर नकारात्मक परिणाम दिसला होता. मात्र तांब्याच्या किंमती २ टक्क्यांनी वाढल्या होत्या. अॅल्युमिनिअमच्या जागतिक निर्मितीतील २० टक्के वापर वाहन क्षेत्रासाठी होतो. युरोप, अमेरिका आणि इतर प्रमुख अर्थव्यवस्थांनी कोरोना रोगाच्या साथीमुळे वाहन क्षेत्रातील उत्पादन प्रक्रिया बंद ठेवल्याने अॅल्युमिनिअम तसेच इतर औद्योगिक धातूंच्या मागणीवरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे या आठवड्यात तांब्याच्या किंमती ३६५ प्रति किलो दराने घसरतील असा अंदाज श्री माल्ल्या यांनी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here